Ajit Pawar : अजित पवारांनी शिरूरमध्ये टाकला डाव, आमदार अशोक पवार यांचा कट्टर विरोधक घेतला राष्ट्रवादीत…

Ajit Pawar : शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात अजितदादांनी इंदापूरच्या मेळाव्यात केली आहे.

अशोक पवार यांचे कट्टर विरोधक, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. याशिवाय आमदार पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम अजित पवार गटाकडून करण्यात आले आहे.
सहकारात चढउतार येत असतात. त्यातूनही मार्ग काढायचा असतो. कधी कधी काही लोकांनी कारखान्याकडे लक्ष न दिल्याने त्याची दुरवस्था होते व त्याची जबरदस्त किंमत तिथल्या उस उत्पादकांना मोजावी लागते असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिरूर तालुक्यात अनेकांसोबत काम केले आहे. आज काही त्यात हयात नाहीत. दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर, गौतम कदम यांच्यासोबत ही काम केले आहे. यापुढे ही पक्ष बळकट करण्यासाठी काम करू. Ajit Pawar
संस्था चालवण्यासाठी प्रयत्न करू. घोडगंगा साखर कारखाना हा रावसाहेब दादा पवार यांच्या नावाने आहे. परंतु सध्या कारखाना अडचणीत आहे. कारखाना बंद पडला आहे. कधी कधी काही लोकांनी जर लक्ष दिले नाही, तर त्या कारखान्याची दुरवस्था होते.
त्याची जबरदस्त किंमत तिथल्या उस उत्पादकांना मोजावी लागते. माझ्या सारख्या शेतकऱ्याला वाटतं की, हे घडू नये. राज्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत. तसेच महायुतीत असलो तरी आम्ही विचारधारा सोडलेली नाही. सहकारात चढउतार येत असतात त्यातून मार्ग काढायचा असतो असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, या मेळाव्यात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष, घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, भाजपचे न्हावरा येथील कार्यकर्ते राजेंद्र कोरेकर, गौतम कदम, मांडवगण फराटा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी फराटे, माजी पंचायत समिती सदस्य ॲड. लक्ष्मण फराटे, माजी संचालक आत्मारामबापू फराटे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, माजी उपसरपंच सुभाष पाटील फराटे आदींनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.