धक्कादायक! विजेच्या खांबाला स्पर्श; तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू..

परभणी : महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे एका ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील मिश्किन प्लॉट परिसरात तीन वर्षीय चिमुकली खेळत होती. तिचा स्पर्श त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबाला झाला होता. त्या खांबात वीजप्रवाह उतरलेला होता.
त्यामुळे तीन वर्षीय चिमुकलीला विजेचा जोरदार धक्का लागल्याने चिमुकली तडफडत खाली कोसळली. कोसळल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी तिला तातडीने जिंतूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले होते.

मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासादरम्यान चिमुकलीला मृत घोषित केले. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.