चिंताजनक ! देशात कोरोनाची संख्या वाढली, पुण्यात आढळून आले ऐवढे रुग्ण….!!

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, २४ तासांत भारतात कोविड-१९ ची ७५२ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३,४२० वर पोहोचली आहे.

२१ मे २०२३ नंतर देशात एकाच दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा नवीन प्रकार एन.१ चा रुग्ण आढळून आला आहे. मात्र आता उपचारानंतर तो बरा झाला आहे.
महाराष्ट्रात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १०३ आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे राजधानी मुंबईतील आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. ठाण्यात १८ आणि पुण्यात १७ सक्रिय प्रकरणे आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्णपणे सतर्क आहे. आरोग्य विभागाला सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. बीएमसीने ऑक्सिजन आणि बेड्सबाबतही आपल्या स्तरावर तयारी केली आहे.

देशात आतापर्यंत एकूण कोविड-१९रुग्णांची संख्या ४.५० कोटी (४,५०,०७,९६४) आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड-१९ मुळे गेल्या २४ तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४४,७१,२१२ झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर ९८.८१ टक्के आहे, तर मृत्यू दर १.१९ टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.