हलगीचा कडकडाट आणि आई राजा उदो उदो चा जयघोष, तुळजाभवानी मातेची घटस्थापना मोठ्या उत्साहात…


तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आई राजा उदो उदो च्या जयघोषात, मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

यावेळी भाविकांनी हलगीचा कडकडाट आणि संबळाचा निनाद केला. तुळजाभवानी देवीच्या सिंहगाभाऱ्यात मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे दाम्पत्याच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.

यावेळी हजारो भाविकांनी या सोहळ्याचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानीची घोरनिद्रा संपुष्टात आल्यानंतर भोपी पुजाऱ्यांनी देवी मूर्तीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापणा केली. यानंतर पारंपारिक धार्मिक विधी होऊन विशेष पंचामृत अभिषेक पूजा करून भाविकांना देवी दर्शनास सोडण्यात आले.

सकाळी देवीची अभिषेक घाट होऊन नित्योपचार पंचामृत अभिषेक पार पडले. महंत व भोपे पुजारी यांनी देवीस नैवेद्य दाखवून धुपारती करून अंगारा हे विधी पार पडले. देवीच्या चांदी सिंहासनाला झळाळी दिल्यामुळे ते अधिक खुलून दिसत होते.

यावेळी तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा बांधली होती. पुढील आठ दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक विधीसाठी यावेळी ब्रह्मवृंदास ओम्बासे दांम्पत्याच्या हस्ते वर्णी देण्यात आली.

यानंतर मंदिरातील उपदेवतांच्या ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सव कालावधीत विविध धार्मिक विधी केले जातात. यावेळी याठिकाणी मोठा बंदोबस्त केला जातो.

यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चना पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विश्वस्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा यांच्यासह तिन्ही पुजारी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!