Pune News : डीएसकेडीएलच्या ठेवीदारांना मिळाला त्यांच्या हक्काचा वाटा, डी. एस कुलकर्णी बाहेर आल्यानंतर प्रक्रियेला वेग…

Pune News पुणे : डीएसकेडीएल कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर यात गुंतवणूक केलेल्या हजारो ठेवीदारांच्या आयुष्यभराच्या जमापुंजीचे काय होणार, हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. मुंबईस्थित अशदान प्रॉपर्टीज कंपनीने डीएसकेडीएलचा ताबा घेतल्यानंतर झालेल्या करारानुसार सुमारे दीड हजार ठेवीदारांना ४ कोटी ६८ लाख रुपये परत केले आहेत. त्यामुळे या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Pune News)

कंपनीच्या कर्जरोखेधारकांनाही पुढील सात वर्षांत परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भागीदारी संस्थांचे ठेवीदार अजूनही वाऱ्यावरच आहेत. बांधकाम व्यवसायात शहरात अग्रेसर असलेल्या डी. एस. कुलकर्णी यांची डीएसकेडीएल ही कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर आर्थिक गैरव्यवहारात त्यांना अटकदेखील झाली.
त्यानंतर लाखो गुंतवणूकदार व ठेवीदारांचे पैसे अडकले. त्यासंदर्भातील लढा अजूनही सुरू आहे. मात्र, राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने डीएसकेडीएल कंपनीवर अवसायक म्हणून मनोज कुमार अग्रवाल यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर विविध प्रक्रिया पार पडल्यानंतर डीएसकेडीएल ही कंपनी मुंबईतील अशदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, क्लासिक प्रमोटर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड व मेसर्स अतुल बिल्डर्स यांना विकली.

यासंदर्भात प्राधिकरणाने १७ जून रोजी हा निकाल दिला. त्यावेळी झालेल्या करारानुसार कंपनीच्या ठेवीदारांना ३० दिवसांच्या आत ठेवीची सर्व रक्कम परत करावी असे ठरले. त्यानुसार अशदान कंपनीने या ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत.

सात वर्षांत मिळणार कर्जरोख्यांचा परतावा..
डीएसकेडीएल कंपनीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अशदान प्रॉपर्टीजने केलेल्या करारानुसार डीएसकेडीएल कपीनचे प्रत्येकी दहा रुपये मूल्य असलेले २ लाख ५८ हजार ८ समभाग (सुमारे २५ कोटी ८० लाख १० हजार ९० रुपये) हे २१ सप्टेंबर रोजी शून्य किमतीचे होणार होते. त्यानुसार हे समभाग नष्ट करण्यात आले, तर त्या बदल्यात १० रुपये मूल्याचे २ कोटी समभाग अर्थात १० कोटी रुपयांचे समभाग नव्याने तयार करण्यास मान्यता देण्यात आली.
या समभागाचा ताबा अशदानकडे असेल, तर कर्जरोख्यांच्या परताव्याबाबत दोन प्रकार करण्यात आले. त्यातील काही कर्जरोख्यांना अर्धा टक्के व्याज परतावा देण्यात येणार असून, उर्वरित कर्जरोख्यांना व्याज मिळणार नसल्याचे ठरले.
कर्जरोख्यांची ही रक्कम १६२ कोटी १ लाख ३५ हजार १० रुपये इतकी आहे. येत्या सात वर्षांत कर्जरोख्यांचा परतावा देण्याचे या बैठकीत ठरले. तसेच कर्मचायांच्या पगारापोटी मंजूर केलेल्या दाव्याची रक्कमही देण्यात आली आहे.