Pune News : पुण्यात आता इलेक्ट्रिक वाहने वाढणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…

Pune News पुणे : सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा बोलबाला वाढू लागला आहे. याच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. आता राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक-वाहन धोरणानुसार पुण्यात (Pune News) ई-रिक्षासह इतर ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यानुसार ई-रिक्षा योजनेचे नियोजन, रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरींग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.
याबाबतच सरकारी आदेश राज्य सरकारने काढला आहे. यामुळे पुण्यात ई-रिक्षांना आता गती मिळणार आहे. बीईसीआयएल ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. तिच्यावर पुणे जिल्ह्यात ई-वाहन धोरण राबविण्याची जबाबदारी असेल.

सध्याच्या नियमावलीचे मूल्यमापन कंपनी करेल. त्यातील त्रुटी शोधून इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढविण्याच्या संधी कंपनी शोधणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस, परिवहन विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, नगरविकाक विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक महापालिका यांच्याशी समन्वयातून काम केले जाणार आहे.
ई-वाहन धोरणाची आखणी कंपनी करणार आहे. याचबरोबर पुणे जिल्ह्यात ठरावीक कालावधीत ई-रिक्षा योजना राबविण्याची जबाबदारीही कंपनीवर असेल. ई-वाहनांसाठीच्या पायाभूत सुविधा, चार्जिंग केंद्रे, विद्युत वाहनांचा अधिकाधिक वापर आणि जनजागृती कार्यक्रम यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढून त्याचा फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी बॅटरी तंत्रज्ञान, चार्जिंग तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात याचा वापर वाढणार आहे.