Pune Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले, १२ दरोडेखोरांवर गुन्हा दाखल, फुरसुंगी येथील घटना..

पुणे : मोटारसायकलवरुन जाणार्या तरुणाला अडवून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोकड, पॅनकार्ड, आधार कार्ड जबरदस्तीने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार व मोटारसायकलवरुन आलेल्या १२ जणांनी हा दरोडा घातल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime)

ही घटना फुरसुंगी येथील चंदवाडी कॅनॉल रोडवर गुरुवारी( ता.७) रात्री साडेआठ वाजता घडली आहे.
याप्रकरणी साईनाथ अंकुश शेडगे (वय २५, रा. कर्वेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारमधून आलेले ५ ते ६ व मोटार सायकलवरुन आलेले ६ अशा १२ जणांवर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे मोटारसायकलवरुन चंदवाडी कॅनॉल रोडवरुन जात होते. त्यावेळी स्विफ्ट कार व मोटारसायकलवरुन काही जण आले. त्यांनी फिर्यादी याला थांबवून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली.
शिवीगाळ करुन त्यांच्या पँटच्या खिशातील पाकिटामधील ५ हजार ५०० रुपये, पॅनकार्ड व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. अगर किसी को कुछ बताया, या पोलिस मे कम्प्लेंट किया, तो तुझे खतम करेंगे, अशी धमकी दिली.
दरम्यान, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे तपास करीत आहेत.