मराठा आरक्षणावरून बारामतीकरांचा अजित पवार यांना घरचा आहेर, म्हणाले अजित पवार बाहेर पडा..


बारामती : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.

अनेक ठिकाणी याचा तीव्र निषेध देखील करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने बारामती शहर आणि तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून या मोर्चा सुरुवात झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.

बारामतीतील कारभारी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. आंदोलकांनी शिंदे, फडणवीस, पवार सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अनेकांनी भाषण करून सरकारला धारेवर धरले होते.

आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सोडले नाही. ‘भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजित पवार बाहेर पडा, बाहेर पडा बाहेर पडा, अजित पवार बाहेर पडा’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, यावेळी हजारोच्या संख्येने बारामतीकर मोर्चात सहभागी झाले आहेत. बारामतीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असणार आहेत. बारामती व्यापारी महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.

काल काटेवाडीत रास्तारोको केला होता. यावेळी देखील सरकारवर टीका करण्यात आली होती. यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!