पुण्यात झिपलाईन करताना पडून २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, आई-आजी जबर धक्क्यात…


पुणे : पुण्यातील तरुणीला झिपलाईनिंग हा साहसी खेळ खेळणं चांगलंच भोवलं आहे. झिपलायनिंग करताना ३० फूट उंची वरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे.

तरल अरुण अटपळकर (वय. २८) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे अटपळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पार्कमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत.

अटपळकर कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्कमध्ये गेले होते. तिथे झिपलाईन करताना तरलचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तरलचे काका नंदकिशोर श्रीपती अटपळकर (वय ५०) यांनी सांगितले की, उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कुटुंबातील १२ सदस्य राजगड वॉटर पार्कमध्ये मजा करण्यासाठी गेले होते. प्रत्येकी १२०० रुपये प्रवेश शुल्क भरले. दिवसभर खेळ खेळले, जेवण केले आणि सायंकाळी झिपलाईन करण्याचं ठरलं. तरल उत्साहाने झिपलाईन करायला गेली, पण अचानक ती २५-३० फूट उंचीवरुन खाली सिमेंटच्या ब्लॉकवर पडली.

नंदकिशोर पुढे म्हणाले, “पार्कमध्ये सुरक्षा उपाय पुरेसे नव्हते. तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अपघात झाल्यास, लोकांना वाचवण्यासाठी जाळी नव्हती. तरलला जेव्हा रुग्णालयात नेले, तेव्हा ती बेशुद्ध होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आम्हाला हे स्वीकारणे खूप कठीण आहे. आम्ही अत्यंत दुःखात आहोत. तरलच्या आजी आणि आईला मोठा धक्का बसला आहे. आम्हाला न्याय हवा आहे, पैशांची भरपाई नको.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, आमचे पथक राजगड वॉटर पार्कमधील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच अहवाल आल्यानंतर कारवाई सुरू करू. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सध्या बंद ठेवण्यात आले आहे. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!