माथेफिरूचा कारणामा! पुरंदरमध्ये बराखीत युरिया टाकल्याने 200 पिशवी कांदा सडला..

पुणे : पुरंदर तालुक्यात बांदलवाडी गराडे, ता. पुरंदर याठिकाणी पोपट नारायण अगिवले यांच्या शेतातील कांद्याच्या बराखीत माथेफिरूने युरिया टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सुमारे 200 गोण्या कांदा सडल्याने अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कांदा फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

एकूण 200 पिशव्यांपैकी केवळ 20 पिशव्यांतील कांदा वापरण्यायोग्य असल्याचे दिसून आले, तर उर्वरित संपूर्ण कांदा फेकून द्यावा लागला. या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सखोल तपास करण्याची मागणी आता केली जात आहे. संबंधित घटनेची तपासणी व दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गराडे बांदलवाडीचे शेतकरी पोपट अगिवले यांनी आपल्या शेतामध्ये कांदा साठवण्यासाठी नवीन बराख तयार करून हवा खेळत राहावी यासाठी बराखीला लोखंडी जाळी लावली होती. बराखीत साठवलेल्या कांद्याला मोकळी हवा मिळत असल्याने कांदा चांगल्या प्रकारे साठवला होता. तो खराब झाला नव्हता. मात्र कोणीतरी हा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अगिवले यांनी त्यांच्या शेतातील बराखीत 4 महिन्यांपूर्वी कांदा साठवला होता. ते बराखीकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना बराखीतून पाणी वाहत असल्याचे दिसले. त्यांनी आत पाहणी केली असता कांद्यात युरिया टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे बहुतांश कांदा सडून गेला होता. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.