दुःखद! शिखर शिंगणापुरातील महादेव यात्रेत 2 भाविकांचा मृत्यू, दरीत कोसळून 13 जखमी
शिखर शिंगणापूर : सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या महादेवाची यात्रा सध्या सुरू आहे. यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वाहून झाल्यानंतर दोघांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
यातील एक भाविक बारामती येथील असून, दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटली नाही. सध्या उन्हाचा त्रास होत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊन जाणवत आहे. यामुळे त्रास भाविकांना होत आहे. कावड यात्रेदरम्यान १३ जण पाय घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत.
दरम्यान, या यात्रेत १ हजारहून अधिक कावडी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये तेल्या भुत्याची कावड ही मुंगी घाटातून वर चढवण्यात आली. या दरम्यान १३ भाविक दरीत कोसळून जखमी झाले होते.
तसेच हृदयविकाराचा झटका आलेल्या भाविकाला यात्रेतील गर्दीमुळे वेळेत उपचार मिळाला नाही. यामुळे या भाविकाचे निधन झाले आहे. मंदिरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी तब्बल तीन तास लागले. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने या भाविकाचा मृत्यू झाला आहे.