ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एआय’साठी एकरी १६ हजार!! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पुणे : उसाचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात ‘एआय’ तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. त्याचा हेक्टरी खर्च २५ हजार आहे. यापैकी ९ हजार २५० रक्कम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, तर साखर कारखान्यांनी सहा हजार ७५० अशी एकूण १६ हजार रुपयांच्या रकमेची मदत शेतकऱ्यांना करण्यात येईल.

तसेच उर्वरित नऊ हजार रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. त्याबाबतचे आदेश सहकार आयुक्तालयाला दिले असून, त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यामुळे आता शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेती करावी असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले की, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्तम ऊस उत्पादन काढले आहे. हे तंत्रज्ञान एकदा बसवले की ते पाच ते सात वर्षे चालते. परंतु, त्याचा वार्षिक खर्च हा चार हजार असून तो शेतकऱ्यांना दरवर्षी करावा लागणार आहे.

इतर फळबागांसाठीही ‘एआय’चा वापर करता येईल. त्यासाठी वसंतदादा इन्स्टिट्यूटकडून दहा हजार एकरांसाठी नऊ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च १० हजार शेतकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. या योजनेत एक लाख शेतकऱ्यांचा समावेश करायचा आहे. उरलेल्या ९० हजार शेतकऱ्यांना हीच योजना त्यासाठी ८५ कोटी रुपये लागतील त्याचीही व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने करू.
पण त्या सर्व शेतकऱ्यांकडे ठिबक हवे, असेही ते म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रात अजित पवार बोलत होते. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.