पहाटे 100 पोलीस माझ्या घरात घुसले ; शिंदे गटाच्या आमदाराच्या आरोपाने खळबळ

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यातील काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत दिसून येणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पहाटे माझ्या घरी शंभर पोलीस शिरले आणि झाडाझडती घेतली असल्याचा आरोप केला आहे.आपल्या नातेवाईकांनाही त्रास दिला जात असल्याचे बांगर यांनी म्हटले.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एक धक्कादायक खुलासा केला. पहाटे सहा वाजता त्यांच्या निवासस्थानी तब्बल शंभर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे नाव घेता टीकास्त्र सोडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस २८ नोव्हेंबर रोजी हिंगोलीत जाहीर सभा घेत आहेत. त्या आधीच संतोष बांगरांनी खळबळजनक आरोप केले आहेत. कळमनुरीत बांगर यांनी भाजपविरोधात शिंदे गटाचा स्वबळावर उमेदवार उभा केला आहे,. यावरून आता भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात संघर्ष वाढला आहे.
आमदार बांगर म्हणाले, “पहाटे सहा वाजता सर्वजण झोपलेले असताना माझ्या घरासमोर शंभर पोलिसांचा ताफा उभा राहिला. घराची झाडाझडती घेतली. कपाटं, कपडे, फ्रिजमधील साहित्य, सगळं सामान बाहेर काढलं. घरासमोर छावणी उभारल्यासारखी स्थिती होती. त्यांनी पुढे म्हटले की, “पोलीस प्रशासनावर दबाव आणून एखाद्या सत्ताधारी विरोधकाच्या घराची झडती घेतली जात असेल, तर हे लोकशाहीला घातक असल्याचे बांगर यांनी म्हटले. या कारवाई मागे नक्की कोणाचा हात आहे, हे राजकीय सूडाचे राजकारण आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष बांगर हे अवैध धंदे करतात असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला होता. हिंगोली पोलीस आमदार बांगर यांना पाठीशी घालत असल्याचा देखील आमदार मुटकुळे म्हणाले होते. या आरोपानंतर हिंगोली पोलिसांच्या पथकाने संतोष बांगर यांचे निवासस्थान असलेल्या वंजारवाडा भागात छापा टाकत घराची झडती घेतली. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.