सिद्धिविनायकच्या दानपेटीत ’18 कोटींचा घोटाळा’ की मोठा गैरसमज? GPay, 19 कर्मचारी आणि वाढलेल्या देणगीचा सदा सरवणकरांनी मांडला संपूर्ण हिशेब

मुंबई : सिद्धिविनायक मंदिर न्यासातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असताना, मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना (शिंदे) आमदार सदा सरवणकर यांनी सर्व आरोपांना सविस्तर उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंदिराच्या दानपेटीत दरवर्षी 18 कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी अशा प्रकारचा कोणताही आरोप संबंधित पत्रात नसल्याचे सांगत त्यांनी हा गैरसमज असल्याचे स्पष्ट केले.
सरवणकर म्हणाले की, सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या काही विश्वस्तांनी सरकारकडे मंदिरातील देणगी व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. मात्र या पत्राचा चुकीचा अर्थ काढत मंदिरात मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात पत्रात कुठेही चोरी किंवा 18 कोटी रुपयांच्या अपहाराचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला.

दानपेटीतील उत्पन्नाबाबत बोलताना त्यांनी महत्त्वाची आकडेवारीही दिली. पूर्वी मंदिराच्या दानपेटीत महिन्याला सुमारे 40 ते 45 लाख रुपये जमा होत होते. मात्र मंदिर परिसरात पारदर्शकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजना, देखरेख आणि व्यवस्थापनातील बदलांमुळे गेल्या महिन्यात ही रक्कम तब्बल 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महसूल वाढल्याचा दावा करत मंदिरातील आर्थिक व्यवहार अधिक शिस्तबद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.


मंदिरातील गैरप्रकारांवर कारवाईबाबतही सरवणकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. दर्शनासाठी काही कंत्राटी कर्मचारी जी-पे (GPay) द्वारे अनधिकृतपणे पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याकडून शपथपत्रही घेण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारचे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर नियम लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, काही कर्मचारी हातचलाखी करून रोख रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचेही तपासात समोर आले. अशा प्रकरणांमध्ये 9 कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिरातील पुजाऱ्यांना भाविकांकडून वैयक्तिक स्वरूपात पैसे मिळाल्यास ते शासनाच्या नियमांनुसार दानपेटीत जमा करणे बंधनकारक असल्याची आठवण करून देत, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरवणकर यांनी मंदिर प्रशासनावर होत असलेल्या आरोपांचे खंडन करत, सिद्धिविनायक न्यास गेल्या दोन वर्षांपासून पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असल्याचा दावा केला. मंदिरातील देणगी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही आवश्यक ती प्रत्येक सुधारणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून आता राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणात पुढे सरकार किंवा संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.