‘दीपाली ताई, एपस्टीन फाईल्स आणा, आम्हाला खरातबाबा बघायचाय!’ विवेकानंद पाटलांच्या विधानाने आंदोलनस्थळी एकच हशा


पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि विविध विधानांची चर्चा रंगली आहे. पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद पोहोचल्या. मात्र, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला त्यांना बोलू दिले नाही. त्यानंतर आंदोलक विवेकानंद पाटील यांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना शांत केले. याचवेळी त्यांनी केलेल्या एका मिश्किल विधानामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

विद्यार्थ्यांचा संताप, दीपाली सय्यद यांना बोलू दिले नाही!

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची जागा सोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी एस. एम. जोशी पुलाचा परिसर मोकळा करण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली होती.

या आंदोलनाला विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेत सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले. याच पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद आंदोलनस्थळी पोहोचल्या. मात्र, त्या बोलण्यासाठी उभ्या राहताच विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

‘दोन दिवसांत निकाल समोर येईल’; दीपाली सय्यद यांचे आश्वासन

विद्यार्थ्यांना संबोधित करताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, त्या एक कलाकार म्हणून विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आल्या आहेत. राज्य सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांनी संयम राखावा, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आपली मनापासून इच्छा असल्याचे सांगत येत्या दोन दिवसांत निकाल समोर येईल, असेही त्यांनी म्हटले.

विवेकानंद पाटलांचा मिश्किल टोला; विद्यार्थ्यांमध्ये हशा

दीपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांनी बोलू न दिल्याने विवेकानंद पाटील यांनी मध्यस्थी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना आधी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर दीपाली सय्यद यांचे आभार मानताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील नाराजी स्पष्ट केली.

‘विद्यार्थ्यांना अर्बन नक्षलवादी म्हटल्यामुळे त्यांच्यात संताप आहे. तुम्ही सरकारमध्ये असूनही विद्यार्थ्यांसाठी इथे आलात, याबद्दल आभार. विद्यार्थ्यांचा राग तुमच्यावर नसून सरकारवर आहे. इतके दिवस आंदोलन सुरू असताना एकही कलाकार आंदोलनस्थळी आला नाही. त्यामुळे इतर कलाकारांचं पुढे काय करायचं, ते आम्ही बघू,’ असे विवेकानंद म्हणाले.

यानंतर त्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत दीपाली सय्यद यांच्या चित्रपटाबाबत मिश्किल विधान केले. ‘एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा दिल्यास आम्ही तुमचा एपस्टीन फाईल्स हा चित्रपट हाऊसफुल्ल करून दाखवू. पण तुम्ही तुमचा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आणा. आम्हालाही खरातबाबा कोण आहे, हे पाहायचे आहे,’ असे ते म्हणाले.

विवेकानंद पाटील यांच्या या विधानानंतर आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनात या मिश्किल टिप्पणीचीही चर्चा रंगली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!