त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत मोठा निर्णय? ‘या’ तारखेपासून दोन महिने दर्शन बंद राहण्याची शक्यता…

नाशिक : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध मंदिर असणारे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात असून याच पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता आहे.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2026 च्या दरम्यान भाविकांसाठी बंद ठेवण्याचे विचाराधीन आहे. तसे झाल्यास दसरा, दिवाळीसह संस्थानच्या 300 वर्षांच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या रथोत्सवाला देखील भाविकांना मुकावे लागू शकते.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विविध मंदिरे आणि इतर कामे वेगाने सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दर्शनपथाचे काम सुरू आहे. याच कामासाठी मंदिर दोन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाने दिला आहे. गुरुवारी पालकमंत्री गिरीश महाजन हे विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले असता देवस्थान ट्रस्ट कार्यालयात याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यावेळी प्रशासनातील उच्च अधिकारी, मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आदी उपस्थित होते.


15 ऑक्टोबरपासून पुढील दोन महिने मंदिर बंद ठेवले तरच दर्शनपथ आणि मंदिर प्रांगणातील कामे प्रगतिपथावर येतील, अशी ठेकेदारांची मागणी आहे. मात्र, विशेष दर्शनपथाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ या यंत्रणेने मागच्या 6 महिन्यांपासून शहरात तोडफोड केली आहे.
त्यासाठी सर्व शासकीय कार्यालये, उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित केले आहेत. तरीही कामाची गती संथ आहे. त्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
दरम्यान, सध्या पितृपक्षामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. पितृकर्म आणि धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होत आहे. तसेच, शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी तसेच, भाविकांना दर्शन घेतला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
मंदिर बंद तरी नित्यपूजा सुरूच राहणार
भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार बंद असले तरी श्री त्र्यंबकेश्वराची धार्मिक परंपरा मात्र खंडित होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मंदिरातील नित्यपूजा, त्रिकाल पूजा तसेच इतर पारंपरिक धार्मिक विधी हे नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नसले, तरी मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी नियमितपणे पार पडणार आहेत. तसेच, मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख आणि कालावधी याबाबत देवस्थान ट्रस्टकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना मिळणार वेग
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहर आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे प्रस्तावित आहेत. रस्ते विस्तारीकरण, पायाभूत सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित कामांना या काळात वेग देण्यात येणार आहे.
मंदिर काही काळ भाविकांसाठी बंद असल्याने विकासकामे आणि आवश्यक नियोजन अधिक सुरक्षितपणे करता येणार असल्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची तयारी करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
