चर्चा शरद लाडांची, पण भाजपचा डाव वेगळाच; पुणे पदवीधरसह तीन जागांवर उमेदवार जाहीर, महायुतीत पुन्हा ठिणगी?


पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप कोणाला संधी देणार, याची उत्सुकता असतानाच पक्षाने अनपेक्षित नाव जाहीर केले. माजी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असताना भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यावर विश्वास दाखवला. एवढेच नव्हे, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देत पक्षाने आपले पत्ते खुले केले. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांसह महायुतीतील जागावाटपाची चर्चाही पुन्हा ऐरणीवर आली आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी तीन उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना संधी देण्यात आली आहे.

शरद लाड यांचे नाव मागे का पडले?

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, भाजपने ऐनवेळी डॉ. स्मिता जाधव यांची निवड केली. त्यामुळे या निर्णयामागील पक्षाची रणनीती काय, याची चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव असलेल्या डॉ. जाधव आता पदवीधर मतदारांचा कौल मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

शिक्षक मतदारसंघातही महायुतीसमोर पेच

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असली, तरी शिवसेनेकडून मंगेश चिवटे आणि सचिन सानप इच्छुक होते. भाजपच्या घोषणेनंतर मंगेश चिवटे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. एकनाथ शिंदे यांनीच उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याचे सांगत, पुढील निर्णय शिंदे आणि सुनेत्रा पवार घेतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिक्षकांच्या प्रश्नांवर गेल्या काही वर्षांत आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याचा दाखला देत चिवटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शालार्थ ओळख क्रमांक, वैयक्तिक मान्यता, जुनी पेन्शन योजना आणि नियमानुसार टप्पा वाढ अशा मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर ते कायम राहतात का, याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचाही पुणे पदवीधरच्या जागेवर दावा

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी पक्षाची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवारांबाबत एकमत होते की मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय पुढे येतो, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने त्यापैकी तीन जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उर्वरित पक्ष कोणाला संधी देतात आणि महायुतीतील इच्छुकांची पुढील भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुणे पदवीधरमध्ये चर्चेतील नावाऐवजी डॉ. स्मिता जाधव यांना संधी आणि शिक्षक मतदारसंघात चिवटे यांची ठाम भूमिका यामुळे निवडणुकीपूर्वीच पुण्यातील राजकारणात नवे प्रश्न उभे राहिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!