इथेनॉल थांबवलं तर शेतकऱ्यांचं काय? फडणवीसांचा थेट सवाल; साखर कारखान्यांपासून ई-२०पर्यंत मांडलं ‘फायदेशीर गणित’

मुंबई : इथेनॉलच्या वापरावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा मुद्दा दिला आहे. इथेनॉलचं धोरण बंद झालं, तर त्याचा थेट परिणाम शेतकरी आणि साखर उद्योगावर होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. इथेनॉल हे केवळ पेट्रोलमध्ये मिसळलं जाणारं इंधन नसून, शेतीमालाला पर्यायी बाजार उपलब्ध करून देणारं महत्त्वाचं माध्यम असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
फडणवीसांच्या मते, साखर कारखान्यांचं अर्थकारण सध्या केवळ साखरेवर अवलंबून राहिलेलं नाही. इथेनॉलमधून कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळतं. जर पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण बंद झालं, तर कारखान्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होईल. परिणामी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देणं कठीण होऊ शकतं. कारखान्यांवरील कर्जाचा बोजाही वाढू शकतो आणि काही कारखाने बंद पडण्याच्या स्थितीत जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.

मका उत्पादक शेतकऱ्यांसाठीही इथेनॉल उद्योग महत्त्वाचा ठरू शकतो, असं फडणवीसांनी सांगितलं. शेतकऱ्याने मका थेट इथेनॉल निर्मितीसाठी दिल्यास त्याला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. बाजारात एखाद्या पिकाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला की त्याचे दर घसरतात. अशावेळी इथेनॉल निर्मितीमुळे त्या मालाला दुसरी मागणी निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजाराचा अतिरिक्त पर्याय मिळतो.


इथेनॉलमुळे वाहनांची इंजिनं खराब होतात, असा दावा केला जात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला. इथेनॉलमुळे इंजिन खराब झाल्याची ठोस घटना दाखवावी, असं आव्हान त्यांनी वाहन उद्योगासमोर ठेवलं. मात्र इथेनॉलची उष्मांक क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असल्याने वाहनाच्या मायलेजवर काही परिणाम होऊ शकतो, हे त्यांनी मान्य केलं. E20 म्हणजे पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण असताना हा परिणाम मर्यादित असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातील अनेक ठिकाणी ५० टक्के आणि १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहनंही वापरली जात असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
दरम्यान, इथेनॉलच्या विरोधात जाणीवपूर्वक एक नॅरेटिव्ह तयार केलं जात असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं. भारताची प्रगती झाल्यामुळे काहींचे हितसंबंध बाधित होत असतील, तर त्यातून विरोधाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे इथेनॉलला विरोध करण्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत, याचा विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी सूचित केलं.
नागपूरमधील इथेनॉल प्रकल्पाचाही फडणवीसांनी उल्लेख केला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प भविष्यात देशासाठी एक मॉडेल ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फडणवीसांच्या मते, इथेनॉलमुळे ऊस आणि मक्यासारख्या शेतीमालाला नवा बाजार मिळतो, साखर कारखान्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतात आणि देशाच्या इंधन गरजांसाठीही पर्याय निर्माण होतो. त्यामुळे इथेनॉलचं धोरण बंद करण्याऐवजी त्यातून शेतकरी, साखर उद्योग आणि इंधन क्षेत्राला कसा अधिक फायदा होईल, यावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.