Yugendra Pawar : राज्याचे लक्ष आज बारामतीकडे! अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आज शरद पवार पक्षाच्या कार्यालयात…

Yugendra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारमतीमध्ये मतदारांना भावनिक साद घालताना माझं कुटुंब सोडून पवार कुटुंब माझ्याविरोधात असल्याचा भावनिक डाव खेळला. पण आता शरद पवार यांनी अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे.

अजित पवार यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हा शरद पवार यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराला उभा राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत गेले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले.
बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीतील कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीसाठी येणार असून, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ते कार्यालयात थांबणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. ते शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे खजिनदारही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फाटाफुटी नंतर बारामतीमध्ये अन्य कोणाचेही शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाले नव्हते, त्यावेळी युगेंद्र पवार यांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीचे भव्य मैदान शारदा प्रांगणमध्ये आयोजित करून शरद पवार यांना निमंत्रित केले होते. Yugendra Pawar
त्यानंतर त्यांच्या राजकीय व्युहरचनेची बारामतीसह राज्यभरात चर्चा झाली होती. दुसरीकडे मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे संपूर्ण कुटुंब आमच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे, मात्र बारामतीकरांनी आपल्याला एकटे पाडू नये असे भावनिक आवाहन केले होते.
त्याला चार-पाच दिवस उलटत नाहीत, तोच युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात येऊन थांबणार आहेत अशी माहिती दिली गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीतील कार्यकर्त्यांमध्ये मात्र, युगेंद्र पवार यांच्या आगमनाच्या चर्चेने चैतन्य पसरण्यास मदत होणार आहे.