8 कोटी तरुणांना मिळणार रोजगार! बाइक टॅक्सीबाबत गडकरींची मोठी घोषणा


नवी दिल्ली : देशातील बाइक टॅक्सी सेवेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्य सरकारांना बाइक टॅक्सीला परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. बाइक टॅक्सी सेवेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असा दावा गडकरी यांनी केला आहे.

‘सुरक्षा’ कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सांगितले की, खासगी दुचाकी आणि स्कूटरच्या माध्यमातून प्रवाशांना वाहतूक सेवा देण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. मात्र, काही राज्यांमध्ये अद्याप आवश्यक परवाने देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्व राज्यांनी बाइक टॅक्सी सेवेसाठी परवाने जारी करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

बाइक टॅक्सीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. त्याचबरोबर प्रवाशांना वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. या क्षेत्रातून सुमारे ८ कोटी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

‘सुरक्षा’ कार्यक्रमातून कामगारांच्या आरोग्यावर भर

गडकरी यांनी ‘सुरक्षा’ कार्यक्रमाचीही माहिती दिली. महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि खाण क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच समुपदेशन करण्यात येणार आहे. ही सुविधा त्यांच्या कामाच्या ठिकाणीच उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात नागपूरच्या कामठी आणि चंद्रपूरमधील खाण क्षेत्रातील सुमारे १० हजार कामगारांना या सुविधेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चालकांचे आरोग्य आणि विशेषतः त्यांच्या डोळ्यांची काळजी घेणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.

वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी ‘निगेटिव्ह पॉइंट सिस्टम’

वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी केंद्र सरकार निगेटिव्ह पॉइंट सिस्टम आणण्याच्या तयारीत आहे. नियम मोडल्यास वाहनचालकांच्या पॉइंटमध्ये कपात केली जाईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होऊन त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची शक्यता आहे.

या व्यवस्थेमुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी वाढेल आणि रस्ते सुरक्षा अधिक मजबूत करण्यास मदत होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!