प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडीओ बनवले अन् 10 महिने सुरू ठेवला नराधमांचा खेळ


कोल्हापूर : प्रेम, विश्वास आणि मैत्रीच्या नावाखाली एका महाविद्यालयीन तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी संतापजनक घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. प्रियकरानेच तरुणीचा विश्वासघात करत तिचे खासगी व्हिडीओ चित्रित केले आणि त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत आपल्या मित्रांसह तब्बल दहा महिने तिचा छळ व अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे राधानगरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख राधानगरीतील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या आदित्य शेटके याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत आदित्यने तरुणीशी जवळीक साधून तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो तयार केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणीवर दबाव टाकला. इतकेच नव्हे तर आपल्या मित्रांनाही या प्रकरणात सहभागी करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजीत मुधोळकर या तिघांनीही धमकावून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार तिचा गैरफायदा घेण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

हा प्रकार गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर पीडितेने धाडसाने पुढे येत तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजीत मुधोळकर या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून मोबाईल, डिजिटल पुरावे आणि इतर बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!