तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो!! लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपल्याने सोनू सूदने केली मदत जाहीर..


लातूर : शेत नांगरणीसाठी बैल नसल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने स्वत:लाच औताला जुंपलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होत आहे. संबंधित शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून नांगरणीसाठी त्यांच्याकडे बैलसुद्धा नाही. हा विडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. असे असताना हार न मानता हा वृद्ध शेतकरी शेती करतोय.

हेच कष्ट पाहून अखेर अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंची मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याने याबाबत ट्विट करत मदत जाहीर केली आहे. ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असं ट्विट त्याने केलंय. तर लातूर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी संबंधित शेतकऱ्याविषयीची माहिती दिली आहे.

त्यांचं नाव अंबादास पवार असून त्यांची 4 बिघा जमीन आहे. ही जमीन सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. आमच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली आणि त्यांना तिथे शेतीसाठी आवश्यक उपकरणांची कमतरता आढळली म्हणून आम्ही त्यांना कृषी विभागात अनुदानित दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितलं.

या शेतकऱ्याकडे कृषी ओळखपत्र नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांना कृषी विभागाकडून ट्रॅक्टर आणि 1.25 लाख रुपये यांसह सर्व उपकरणे मिळतील, असेही ते म्हणाले. या वृद्ध शेतकऱ्याकडे शेत नांगरणीसाठीही पुरेसे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत वृद्ध दाम्पत्याने स्वत:च नांगर ओढण्यास सुरुवात केली.

याचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कृषीप्रधान देशातले वास्तव्य सगळ्यांसमोर आणले आहे. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर कृषी अधिकारी त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना अजूनही राज्यातील असंख्य शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याची प्रचिती या शेतकऱ्यांकडे बघून येते. आता या शेतकऱ्याला अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!