पुरंदर विमानतळाच्या कामांना वेग! 91% शेतकऱ्यांची संमती; सरकारकडून निविदा प्रक्रियेला हिरवा कंदील..


पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीला आता मोठा वेग मिळणार आहे. भूसंपादनासाठी तब्बल 91 टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर राज्य सरकारने प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) ला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये सुमारे 3 हजार एकर क्षेत्रावर हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून, त्यासाठी 1,216 हेक्टर जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी संमती दर्शवल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार असून तो HUDCO मार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या SPV मध्ये सिडकोचा 51 टक्के, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC)चा 19 टक्के, तर PMRDA आणि MIDCचा प्रत्येकी 15 टक्के सहभाग आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिडको, वित्त, वाहतूक, नगरविकास विभाग, एमआयडीसी तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते. बैठकीत DPR तातडीने तयार करून निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे सरकारचे नियोजन असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन, DPR आणि निविदा प्रक्रियेस आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाणार आहे.

31 जुलैपर्यंत संमतिपत्रासाठी मुदतवाढ

भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांकडून संमतिपत्र स्वीकारण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. अधिकाधिक जमीनधारकांनी स्वेच्छेने सहभागी व्हावे, यासाठी महसूल विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोबदल्याची रक्कम जमा करण्यात आली असून उर्वरित जमीनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह 31 जुलैपूर्वी संमतिपत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेल्या या विमानतळामुळे पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क वाढून गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!