मुंबईकडे ‘पिवळं वादळ’ कूच करणार? धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडेंचा मोठा एल्गार; १ डिसेंबरला अहिल्यानगरमध्ये निर्णायक घोषणा!


अहिल्यानगर : धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असून, आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी १ डिसेंबरची तारीख महत्त्वाची ठरणार आहे.

दीपक बोराडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून आरक्षणाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. गेल्या आठ दशकांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याच मागणीसाठी समाजाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा बोराडे यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या सभेत आरक्षणासंदर्भातील अभ्यास पूर्ण झाल्याचे सांगितले होते आणि सत्ता देण्याचे आवाहन केले होते, असेही त्यांनी नमूद केले. धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्याचे फडणवीस अनेकदा सांगत असल्याचा उल्लेख करत, आता दिलेला शब्द पाळला जात नसल्याची टीका बोराडे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठवाड्यातून सुरू झालेला लढा आता पश्चिम महाराष्ट्रात

धनगर आरक्षण आंदोलनाची सुरुवात १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाड्यातून करण्यात आली होती. त्यानंतर हा लढा टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे बोराडे यांनी सांगितले. गेल्या बारा वर्षांपासून भाजप सरकार धनगर समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप करत, मोठ्या संघर्षासाठी समाजबांधवांना तयार केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

१ डिसेंबरला मुंबई मोर्चाची तारीख ठरणार?

या आंदोलनातील पुढचा महत्त्वाचा टप्पा १ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे होणारा धनगर समाजाचा महाएल्गार मेळावा असणार आहे. हा मेळावा सरकारला इशारा देण्यासाठी आयोजित करण्यात येत असल्याचे बोराडे यांनी सांगितले. या सभेतून मुंबईकडे कूच करण्याच्या मोर्चाची तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे धनगर समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा कार्यक्रम नेमका कधी ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला ९० दिवसांचा कालावधी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनगर समाजानेही आंदोलनाची तयारी वेगाने सुरू केली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारसमोरील आव्हान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!