लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा?, महत्वाची माहिती समोर…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची पात्र महिलांना आतुरतेने प्रतीक्षा होती. राज्य सरकारने आता ही रक्कम लवकरच देण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.
ऑगस्ट महिन्याची रक्कम सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस वितरित करण्यात आली होती. आता सप्टेंबर महिन्याचे हप्ते कधी येणार, याकडे सर्व लक्ष लागले आहे. पण लवकरच सप्टेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचे कळत आहे.
योजनेची एक महत्वाची अट अशी आहे की, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, त्या कुटुंबातील महिला या योजनेस पात्र ठरतील. पात्रता तपासण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दरम्यान, यात आधार कार्ड पडताळणी तसेच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी प्रक्रियेनंतर ज्या महिला पात्र नाही किंवा अटी पूर्ण होत नाहीत, त्यांना लाभार्थी यादीतून वगळले जाईल. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आल्याने चौकशी प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे ई-केवायसी नंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते.