पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक सकाळी 7 वाजल्यापासूनच सुरु होणार?

पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यावर येऊन ठेपला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका दोन-तीन दिवस चालतात, हे पुण्याचे खास वैशिष्ट्य.या विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्त्वाचा वळण घेणारा निर्णय आता काही गणेश मंडळानीं घेतला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू करावी अशी मागणी मंडळांनी केली आहे.

पुणे गणेश उत्सवाच्या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजल्यापासून सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रत्येक मंडळासोबत केवळ एक ढोल ताशापथक असावे अशा सूचना मांडण्यात आल्या.तसेच मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सकाळी साडेदहानंतर सुरू होणार असेल, तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना त्याआधी मिरवणूक सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या मंडळांनी केली. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर 300 हून अधिक मंडळी सहभागी होतात. त्यामुळे विसर्जन पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो.मानाच्या पाच गणपतीच्या विसर्जनामुळे इतर मंडळाना मोठ्या प्रमाणात वाट पाहावी लागते,यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना काही मंडळानीं व्यक्त केली आहे. त्यामुळे मानाच्या गणपतीच्या आधी मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी मिळावी अशी मागणी मंडळांनी केली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पुण्याची विसर्जन मिरवणूक खऱ्या अर्थाने बदलणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागल आहे.
दरम्यान आगामी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार समाविष्ट झालेल्या गावांना पालिकेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
