दौंडला भविष्यात मुळशी धरणाचे पाणी! शेतीवरचा पाण्याचा भार कमी करणार!! डाळींब बन श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न….!!

उरुळीकांचन : पाऊस लांबल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे,कालव्यातून दौंड तालुक्याला मुबलक पाणी मिळावे म्हणून पुढील काळात प्रयत्न केले जाणार असून मुळशी धरणाचे पाणी मिळवून दौंडच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवेन,असा निर्धार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी श्री क्षेत्र विठलं बन डाळिंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.
डाळींब बन (ता.दौंड) येथील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दौंड , हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीची महापूजा दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राहुल कुल हे बोलत होते. यावेळी दौंड चे माजी आमदार रमेश थोरात, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, डाळींब चे सरपंच बजरंग म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन , किर्ती कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार राहुल कुल म्हणाले ,दौंड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत,त्याच पाणी प्रश्न राहिला असून दौंड तालुक्याला कालव्याने मुळशी धरणाचे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, पाऊस लांबला आहे, अन्यही प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न सुटावेत अशी प्रार्थना केली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक देवस्थानचे अध्यक्ष आणि डॉ. मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी, सूत्रसंचालन सचिन एल. बी. म्हस्के यांनी तर आभार तानाजी म्हस्के यांनी मानले.
दरम्यान आषाढी एकादशी निमित्त डाळींब बन येथील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दीड लाख भाविक पहाटेपासून दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.