सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा भत्ता मिळणार? महत्वाची माहिती आली समोर…

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना विविध कामांसाठी अनेक प्रकारचे भत्ते देते, ज्यात गणवेश किंवा विशेष पोशाख खरेदी करण्यासाठी दिला जाणारा भत्ताही समाविष्ट आहे.
आतापर्यंत हा भत्ता वर्षातून एकदाच दिला जात असे, मात्र आता सरकारने यात बदल केला असून, तो वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा दिला जाऊ शकतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०१७ मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पूर्वी दिले जाणारे कपडे भत्ता, मूलभूत उपकरणे भत्ता, किट देखभाल भत्ता, बूट भत्ता इत्यादी अनेक भत्ते एकत्रित करून एक ‘गणवेश भत्ता’ देण्यास सुरुवात झाली.
हा भत्ता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार आणि आवश्यकतेनुसार गणवेशाची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी दिला जातो. पारंपरिकरित्या हा भत्ता वर्षातून एकदाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असे.
मात्र, केंद्राने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकानुसार, आता हा भत्ता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा वितरित केला जाऊ शकतो. विशेषतः, जुलै २०२५ नंतर केंद्र सरकारी सेवेत नव्याने सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल, असे म्हटले आहे.
याचा अर्थ, नवीन कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यावर गणवेशासाठी संपूर्ण वर्ष वाट पाहण्याची गरज भासणार नाही, तर त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार हा भत्ता मिळू शकेल. यासाठी एक सूत्रही निश्चित करण्यात आले आहे: (वार्षिक भत्त्याची रक्कम / १२) x महिन्यांची संख्या (सेवेत रुजू झाल्याच्या महिन्यापासून पुढील वर्षाच्या जूनपर्यंत). उदाहरणार्थ, जर वार्षिक भत्ता २०,००० रुपये असेल आणि कर्मचारी ऑगस्टमध्ये रुजू झाला, तर त्याला त्या वर्षासाठी (२०,०००/१२ x ११) = १८,३३३ रुपये भत्ता मिळू शकेल.