एकनाथ शिंदेंचे चार शिलेदार अडचणीत येणार? मुख्यमंत्र्यांच्याकडे कोणी केली चौकशीची मागणी

पुणे : महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे.शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी याबाबत बोलताना असे म्हटले आहे की, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन करेन की शिंदे गटातील भ्रष्ट मंत्री संजय राठोड, संदीपान भुमरे १५० कोटी जमीन ड्रायव्हरच्या नावावर, संजय शिरसाट, उदय सामंत अशा मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आले आहेत, त्यांची एकत्रित एसआयटी स्थापन केली पाहिजे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणावर, महापालिका निवडणुका आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार केला जात असल्याच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्या जाहीर होऊद्या. लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत. स्वत: राज ठाकरे यांनी व्यासपीठावरुन सांगितलंय, की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू. तसंच उद्धव ठाकरेही म्हणाले आहेत, की लोकांच्या, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं हा लोकांचा रेटा आहे. फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला हवा, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रिकरणावर भाष्य केलं आहे
