धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी सह आरोपी करा, अशी मागणी का जोर धरतेय? आता मुंडे यांचा पहिला धक्कादायक कारणामा आला समोर…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये माझा संबंध नसल्याचे मुंडे यांच्याकडून सांगितले जात आहे.
आता पुरवणी दोषारोप पत्रात मिळत असलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांचे पहिले कनेक्शन समोर आल्याचे सांगितले जात आहे. अवादा कंपनीला जी खंडणी मागण्यात आली, ती धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या कंपनीच्या कार्यालयातूनच मागण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अशी की, अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. सुनील शिंदे हे अवादा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आहेत. शिंदे आणि शिवाजी थोपटे या दोघांना वाल्मीक कराडने याच कार्यालयात बोलावून घेतले होते, अशी नवी माहिती पुरवणीच्या दोषारोपत्रातून समोर आली आहे.
यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेले असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केले आहे की, या एका आमदारामुळे राज्य नासले जात आहे. याला पाठीशी घालू नका, यामुळे वातावरण तापले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असे त्यांचे समर्थक सांगत असले, तरी दोषारोप पत्रात अशा स्वरूपाची मांडणी असेल, तर हे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या पर्यंत पोहोचू शकते. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत अजुन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.