बारामती येथे पेट्रोल पंप व्यवस्थापकाकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..
बारामती : बारामती- पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपाची रोकड बँकेत भरण्यासाठी निघालेल्या व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ४८ तासांत पकडण्यात यश आले आहे.
गुन्ह्यात पेट्रोल पंपावरील कामगाराचा सहभाग निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी एक साथीदार अद्याप फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत.
सोन्या उर्फ अभिषेक दत्तात्रय गावडे (रा. मेडद, ता. बारामती) व अक्षय बाळू दहिंजे (रा. सटवाजीनगर, बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक मयुर बाळासाहेब शिंदे सोमवारी (ता. ७) नेहमीप्रमाणे ते शनिवार व रविवारी जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी निघाले होते.
त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या व दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र मयूर शिंदे यांनी प्रतिकार करत त्यांना पिशवी दिली नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी प्रकरणी तातडीने घटनास्थळी भेट देत तपासाची सुचना केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जखमी शिंदे यांना उपचाराकामी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात होता.
या तपासात बारामती तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यांचे सहकार्य घेण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, वाहन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचा अन्य एक साथीदार अद्याप फरार असून पोलिसांकून त्याचा शोध सुरु आहे.