वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राजेंद्र आणि सुशील हगवणे लपले कुठे? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर…

पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील अजूनही फरार आहेत. हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर तिच्या वडिलांनी, सासरकडील मंडळीने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालात तिला मारहाण झाल्याचे समोर येत आहे.

दोघांवर हुंड्यासाठी छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप असून, त्यांना पकडण्यासाठी बावधन पोलिसांनी दोन विशेष पथके परराज्यात रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची ठिकाणं गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे अटक प्रकिया आव्हानात्मक ठरते आहे.
दरम्यान, वैष्णवीच्या १० महिन्यांच्या चिमुकल्याला एका अज्ञात व्यक्तीकडून कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आधी हे बाळ हगवणे कुटुंबीयांकडे होतं. या घटनेमुळे वैष्णवीच्या वडिलांनी अधिक भावनिक होत तातडीने राजेंद्र हगवणेंना अटक करण्याची मागणी केली आहे.

वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी 26 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तपासात ५१ तोळे सोनं गहाण ठेवून त्या पैशाचं काय केलं याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, राजेंद्र हगवणे यांचा मोठा मुलगा सुशील हगवणेच पीडित आहे, असा नवा दावा त्याची पत्नी मयुरी हगवणे हिने माध्यमांसमोर केला आहे. तिचं म्हणणं आहे की, सासरच्या मंडळींकडून तिच्या पतीला देखील मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. त्यामुळे ती दीड वर्षांपासून वेगळी राहत आहे.
राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांवरून हटवण्यात आले आहे. पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून, पक्ष अशा प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही.” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.