चाकणची वाहतूक कोंडी कधी सुटणार? बाह्यवळण मार्गाचे कामही रखडले..

चाकण : पुण्याचा औद्योगिक विकास हा चाकण परिसरात झाला आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकणचा प्रस्तावित बाह्यवळण मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने प्रस्तावित केलेला रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा मार्ग अजूनही लाल फितीत अडकलेला आहे.
यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्ष हा मार्ग होणार असे सांगितले जाते. परंतु वाहतूक कोंडीला पर्याय असणारा हा बाह्यवळण मार्ग काही होत नाही.
यामुळे वाहतूक कोंडी रोजचीच झाली आहे. तो लवकर व्हावा अशी नागरिक, उद्योजक, कामगारांची मागणी आहे. चाकणला बाह्यवळण मार्ग व्हावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ॲड. संकेत मेदनकर यांनी दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग प्रस्तावित आहे. दरम्यान, वाहतूक विभागाचे तत्कालीन पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पीएमआरडीएच्या आयुक्तांशी पत्रव्यवहार केला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गाचे काम मार्गी लावावे, अवजड वाहतूक शहराबाहेरून जाण्यासाठी बाह्यवळण मार्ग लवकर व्हावा असे नमूद करण्यात आले आहे.