गौतमीसाठी कायपण! गावात गौतमी येणार म्हणून बसचालकाचा सुट्टीसाठी अर्ज…
तासगाव : लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार असल्याने, दोन दिवस रजेची मागणी केली आहे.
हा रजा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.तसाच उल्लेख रजा अर्जावर केला आहे. त्यामुळे या रजेची भलतीच चर्चा रंगली आहे.
तासगाव तालुक्यात 21 मे रोजी वायफळे येथे कार्यक्रम होणार आहे. गौतमी चा कार्यक्रम तोही पहिल्यांदाच तासगाव तालुक्यात होत असल्यामुळे या कार्यक्रमाची तालुक्यात गौतमीच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
या कार्यक्रमाला जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तासगाव आगारात चालक असणाऱ्या यमगरवाडी येथील एका चालकाने चक्क दोन दिवसांच्या रजेची मागणी केली आहे. ‘गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची रजा मिळावी.’ असा उल्लेख रजा अर्जावर केला आहे. 22 आणि 23 मे रोजी दोन दिवसांची रजा मिळणेबाबत गुरुवारी आगार प्रमुखांकडे रजा अर्ज दिला आहे.
सबसे कातील गौतमी पाटील! हा डायलॉग अलीकडच्या काळात का फेमस झाला असावा, याचा प्रत्यय देणारा हा रजा अर्ज आहे. रजा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याची तालुक्यात जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
अर्जावर असणारी सही देखील बोगस..!
दरम्यान सदरच्या अर्जाबाबतीत संबंधित चालकाशी संपर्क केल्यावर याबाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकाने कोणत्याही प्रकारचा असा अर्ज लिहिला नाही किंवा तो एसटी प्रशासनाकडे सादर देखील केला नाही. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणाने हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आलं आहे.
सदरचा अर्ज पूर्ण खोटा असून त्यावरील त्या चालकाची सही देखील बोगस आहे आणि तासगावच्या एसटी विभागाकडे असा कोणत्याही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज देखील आला नसल्याचा समोर आलं आहे. मात्र सदरचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.