डोकेदुखीच्या उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेली, डॉक्टरने गुंगीच्या गोळ्या दिल्या अन्…; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार


छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या समर्थ क्लिनिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप समोर आला आहे. डोकेदुखीच्या उपचारासाठी आलेल्या ४५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टरवर करण्यात आला आहे.

एवढेच नव्हे, तर या घटनेचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने महिलेची बदनामी झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित डॉक्टरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामदास महादू तरटे (वय ५०, रा. फुलंब्री) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. २० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला डोकेदुखीचा त्रास होत असल्याने ती १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास समर्थ क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरने तिला औषधी गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर तिला गुंगी आली. याच अवस्थेत डॉक्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

या कथित घटनेचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे फुलंब्री पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांकडून संबंधित पुरावे, डिजिटल स्वरूपातील माहिती आणि इतर अनुषंगिक बाबींची नियमानुसार पडताळणी केली जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी काही महिलांचे व्हिडीओ प्रसारित झाल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. मात्र, या संदर्भातील माहितीची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!