मासेमारीसाठी गेले अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं! नागपुरात हसत्या-खेळत्या मुलांचा दुर्दैवी अंत, कुटूंबाचा एकच आक्रोश…

नागपूर : याठिकाणी पाच मित्रांची मासेमारीची भटकंती दोन कुटुंबांसाठी काळरात्र ठरली आहे. येथील लावा दावलमेती रोडवरील एका शेतातील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धीरज नारनवरे आणि नैतीक विपिन वानखेडे (१६) यांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता धीरज, नैतीक आणि त्यांचे तीन मित्र लावा रोडच्या दिशेने गेले. घरी कोणालाही न सांगता ते सर्वजण फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ही घटना घडली आहे.
शेतात काही वैयक्तिक कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता, ज्यात पावसाचे पाणी साचले होते. यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघेही पाण्यात अडकून बुडू लागले. काठावर उभे असलेल्या त्यांच्या इतर तीन मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वाचले नाहीत.

दोघांना पाण्यात बुडताना पाहून मित्र घाबरले आणि मदतीसाठी आरडाओरड करू लागले. त्यांच्या आवाज ऐकून शेताजवळील काही नागरिक घटनास्थळी धावले आणि मदतीसाठी इतरांना पाचारण केलं. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.
वाडी पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गोताखोरांच्या मदतीने धीरज आणि नैतीक यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.