Weather Update : काळजी घ्या! पुण्यात तापमानात मोठी वाढ, शहराचा पारा ४० अंशांवर…
Weather Update : राज्यात सध्या उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. वातावरण तापू लागल्याने एक प्रकारची दाहकता जाणवत आहे. त्यामुळे उष्णतेनं अख्खा महाराष्ट्र हैराण आहे. मार्च महिन्यातील शेवटचा आठवडा हा अत्यंत तापदायक ठरणार असून ३० मार्चपर्यंत राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विदर्भासह, पुणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे.
सोमवारी दिवसभर पुणेकर असह्य उकाड्याने हैराण झाले. शहरातील कोरेगाव व लवळे या भागांचा पारा ४० अंशांवर गेला होता. दुपारी आकाश किंचित ढगाळ असल्याने उष्मा जास्तच जाणवत होता. Weather Update
शहराच्या कमाल व किमान तापमानात मोठे बदल झाले असून शहराचे सरासरी कमाल तापमान सोमवारी २५ मार्च रोजी ३८ अंशांवर पोहोचले. सकाळी १० ते दुपारी ३.३० पर्यंत उष्मा जास्त जाणवत होता.
त्यामुळे या वेळेत काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा सुती कपडे घालावे, सतत पाणी, सरबत, ताक घ्यावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.