अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावरून पाकला इशारा..


नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या ७९व्या पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. या वेळी त्यांनी १४० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आल्याचे सांगत एकात्मतेचा संदेश दिला आहे.

तिरंगा देशाच्या प्रत्येक घरात फडकत आहे, वाळवंटापासून हिमालयापर्यंत आणि समुद्रकिनाऱ्यापासून गजबजलेल्या शहरांपर्यंत, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील शूर सैनिकांचे गौरवगान करत शत्रूला दिलेल्या कडक प्रत्युत्तराचा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही. सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी या करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. भविष्यात भारत हा करार सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

मोदींनी आपल्या भाषणात पहलगाममधील दहशतवाद्यांच्या संहाराचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ हा देशाच्या संतापाचा आवाज होता. आम्ही सेनादलाला पूर्ण मुभा दिली होती आणि लक्ष्य तसेच कारवाई त्यांनी स्वतः ठरवली.” पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सिंधू पाणीवाटप करारावर तीव्र टीका करताना मोदी म्हणाले, आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. भारतातून निघणारे पाणी शत्रूच्या शेतांना जात आहे आणि आपल्या जमिनी तहानल्या आहेत. सात दशकांपासून शेतकऱ्यांना यामुळे प्रचंड फटका बसला आहे. भारताच्या हक्काच्या पाण्यावर भारताचाच अधिकार आहे आणि शेतकरी व राष्ट्रहितासाठी आम्ही हा अन्याय सहन करणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!