48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? शिंदे गट- भाजपमध्ये जुंपली…!
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागांवर लढावं लागेल कारण शिंदेंच्या शिवसेनेकडे 50 च्या वर आमदारच नाहीत असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होत. बावनकुळेंच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? असा सवाल करत शिरसाट यांनी बावनकुळेंच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट म्हणाले, बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत.उलट अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे असं शिरसाट यांनी म्हंटल. 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, बावनकुळे यांनी केलेले विधान हे अतिउत्साहात केलेलं आहे. त्यांना वाटत मी पक्षाचा अध्यक्ष आहे. माझ्या नेतृत्वाखाली जागा जास्त याव्या यांच्यात काही वावगं नाही. परंतु अशा प्रकारचे स्टेटमेंट केल्याने आपल्या सहकारी पक्षाला त्रास होतो. अशा प्रकारचे निर्णय प्रदेशाध्यक्ष किंवा स्थानिक पातळीवरील नेते घेत नाहीत तर वरिष्ठ पातळीवर होत असतात त्यामुळे आपल्याला जेवढे अधिकार आहेत तेवढंच बोललं पाहिजे असा टोलाही संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे.