बंगळूरु घटनेने विराट कोहलीला धक्का, ११ जणांच्या मृत्यूवर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, माझं मन…

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडलेली चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडली असून, यावर आता विराट कोहली याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये RCBच्या विजयाचं उत्साहात सेलिब्रेशन सुरु असताना, बाहेर हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी झाली होती. या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर विराट कोहलीने एक भावनिक प्रतिक्रिया देत म्हटलं, माझं मन मोडलंय… मी निशब्द झालोय.
RCB संघाने देखील याबाबत शोक व्यक्त करत एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. दुर्घटनेबद्दल आम्हाला माध्यमांद्वारे माहिती मिळाली. या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दु:ख झालं आहे. आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये तात्काळ बदल केला असून, प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचं पालन केलं. आमच्या सर्व चाहत्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो, असं आरसीबीने स्पष्ट केलं आहे.
या घटनेने अनेक माजी क्रिकेटपटूंनाही भावुक केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर लिहिलं, जे घडलं ते अकल्पनीय आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. ईश्वर सर्वांना शांतता आणि शक्ती देवो.