Viral Video : काय सांगता! ऑपरेशन थिएटरमध्ये प्रि-वेडिंग शूट, धक्कादायक प्रकारानंतर डॉक्टर निलंबित…
Viral Video : कर्नाटकातल्या चित्रदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथल्या भारमसागर गावातील सरकारी रुग्णालयात प्री-वेडिंग शूटचा भाग म्हणून एका व्यक्तीचं चक्क बनावट ऑपरेशन करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर दाम्पत्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. याची माहिती जिल्हाधिकारी टी व्यंकटेश यांना मिळताच, त्यांनी डॉ. अभिषेक यांना बडतर्फ करण्याचे आदेश जारी केले. ते रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असून आक्षेपार्ह वागणूक आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यानं त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, डॉक्टर अभिषेक हे एका रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि त्यांची होणारी पत्नी त्यांच्यासमोर उभी राहून त्यांना मदत करत असल्याचे दिसते.
शेजारी उभे असलेले इतर सहकारी हसत आहेत आणि ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात आहे तोही उठून बसतो आणि जोरात हसायला लागतो. लक्षणीय बाब म्हणजे ज्याच्यावर शस्त्रक्रिया करत असल्याचे दाखवण्यात आले तो खरा रुग्ण नव्हता, शुटींगसाठी नाटक करण्यात आले. Viral Video
दरम्यान, या घटनेबाबत चित्रदुर्गच्या डीएचओ डॉ. रेणू प्रसाद यांनी सांगितले की, एनएचएममध्ये कंत्राटी पद्धतीनं वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.
त्या म्हणाले की, ऑपरेशन थिएटर काही महिने बंद होतं. डॉक्टरांनी त्याच थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट केलं. आम्ही भरमसागर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे ते म्हणाले आहे.