गाव म्हणतंय दादा दारूबंदी करा, दादा म्हणाले मी शरद पवार सुप्रिया सुळे येतो आणि…, अजितदादांनी पोलिसांना सुनावलं
बारामती : येथील पाहुणेवाडी येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी भाषण करत असताना अजित पवार यांना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी दारूबंदीबाबत एक पत्र दिले. यावेळी दादांनी मोठे वक्तव्य केले.
ते म्हणाले, पाहूणेवाडी गावातील दारूबंदी करा. आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार येतो आणि कुठं कुठं दारूच्या भट्ट्या आहेत ते शोधत बसतो. पोलिस निवांत पगार घेतील.
तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यामध्ये काही हस्तक्षेप नसतो, असे अजित पवार म्हणाले. पाहुणेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गावठी हातभट्टी निर्मिती दारूविक्री रात्रं-दिवस उघडपणे चालू आहे.
यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोठ्या प्रमाणात इतर शेजारी चार गावात दारूची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. पाहूणेवाडी गावठाण तसेच वस्ती वाड्यावर गोरगरिबांचे प्रपंच उध्वस्त झालेत.
दारू पिणाऱ्यांमुळे गावातील इतर लोकांना विनाकारणपणे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावात विनाकारण तंटे निर्माण होतात. यामुळे दादांनी पोलिसांची कान उघडणी केली.