Vijay Shivatare : विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार, म्हणाले, मी माघार घेणारच नव्हतो, पण..
Vijay Shivatare : अखेर विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंना दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू, अशी घोषणाही त्यांनी आज (ता.३०) केली. कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बारामातीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार शिवतारेंनी केला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी विजय शिवतारेंशी मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर शिवतारेंचं बंड थंड होणार?, अशा चर्चा रंगली. अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीतून माघार घेतली आहे. Vijay Shivatare
शिवतारे काय म्हणाले?
मी माघार घेणारच नव्हतो परंतु मला एक फोन आला आणि त्यांनी माझं मतपरिवर्तन केलं. तो फोन मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातून काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि पुरंदर जनतेच्या विकासासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. जो निर्णय असेल तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत.
माझे आयुष्य किती आहे हे मला माहित नाही. मी अनेक आजारांनी त्रस्त आहे. हे लक्षात घेता, जनतेचे हित मी जोपासायचे ठरवले आहे. निवडणूक न लढता आपल्या मागण्या मान्य होत आहेत. दीड लाखांचे लीड पुरंदर तालुक्यातील महायुतीला द्यायचे आहे, असे आमचे ठरले आहे.
पुढे म्हणाले की, ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली.
मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावे लागेल. १५ ते २० लोकसभा उमेदवार पडू शकतात. असे मला सांगण्यात आले.
यामुळे महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.