पूर्व हवेलीत भाजीपाला, फळबागांना मोठा फटका! शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी…

उरुळीकांचन : दौंड तालुक्याला लागून असलेल्या पूर्व हवेली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड प्रमाणात झोडपल्याने पालेभाज्या तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून सलग चौथ्या दिवशीही पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांची पूर्णतःहा वाताहात झाली आहे. अचानकपणे सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने दौंड तालुक्याशेजारील पूर्व हवेली तालुक्यात सलग चौथ्या दिवशी हाहाकार माजविला आहे.

दिवस -रात्रीला पावसाचा प्रचंड जोर असल्याने पूर्व हवेली तालुक्यात शिंदवणे,उरुळीकांचन, खामगाव टेक व टिळेकरवाडी या भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. तर उर्वरीत तालुक्यात पावसाच्या दमदार खेळ सुरू असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अचानक झालेल्या दमदार पावसाने पालेभाज्या पीक असलेल्या टोमॅटो, भेंडी, वांगी ,गवार कोंथिबीर व पालक या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी सिटकॉन मका ,कडवळ पिके भुईसपाट झाली आहे. तर सर्वाधिक डाळींब पिकाला मोठा दणका दिला असून डाळींब पिकाचा बहर संपुष्टात येण्याची परिस्थिती उद्भवली आहे
अचानक झालेल्या सलग पावसाने ऊस लागवडीवर परिणाम झाला असून पाऊस उघडीप घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या लागवडी खोळंबून बसल्या आहेत. तर या अचानक पावसाने ताली, बांध फुटण्याचे प्रकार घडले आहे. पूर्व हवेलीत पालेभाज्या व फळबागांना सर्वाधिक नुकसान झाल्याने शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होऊ
लागली आहे.

नर्सरी व्यवसायाला फटका सलगच्या दमदार पावसाने नर्सरी उद्योगाला मोठी झळ बसण्याची भिती व्यक्त होत आहे. सततच्या पावसाने रोपवाटिका पाण्याखाली जात असल्याने नर्सरी व्यवसायिकांची पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत सुरू आहे. सलगच्या पावसाने शोभिवंत झाडांची पत खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
” पूर्व हवेलीत दमदार पावसाची परिस्थिती तसेच पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता गृहीत धरता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली आहे. त्यांना सुरक्षिततेच्या उपायांसहीत खबरदारी घेण्याची चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता लवकरच पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यात येणार आहे.”
ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके , आमदार शिरुर-हवेली