विधान परिषद निवडणुकीत स्पायकॅमचा वापर? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; खिशाला पेन लावून मतदानाचे रेकॉर्डिंग केल्याचा दावा


पुणे : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीदरम्यान स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर करून मतदारांना पैसे दिले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी समोर आल्याचे म्हटले आहे. भाजपकडून पैसे वाटप करताना स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मतदारांच्या खिशाला असे पेन लावून भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचे चित्रण केले जाते आणि मतदानानंतर हा व्हिडिओ दाखवल्यावर ठरलेले पैसे दिले जातात, अशा तक्रारी मतदारांकडून येत असल्याचे सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

या प्रकरणाची निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाजप उमेदवाराच्या मतदानाच्या व्हिडिओवरही आक्षेप

सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्या पोस्टमधून पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या मतदानाच्या व्हिडिओचा मुद्दा उपस्थित केला. मतदान केंद्रात पक्षीय ओळख बाजूला ठेवून सामान्य मतदाराप्रमाणे प्रवेश करणे अपेक्षित असताना, उमेदवाराने पक्षाचे चिन्ह गळ्यात घालून मतदान केंद्रात प्रवेश कसा केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हा प्रकार आदर्श आचारसंहितेचा भंग आहे का आणि संबंधित उमेदवारावर काय कारवाई केली जाणार, याचे स्पष्टीकरण राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

‘स्पायकॅम काय असतं, मला माहीत नाही’; फडणवीसांची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “मला स्पायकॅम काय असतं, हे माहीत नाही. मी कधी पाहिलाही नाही. असं काही असेल तर सुप्रिया सुळे यांनी माझ्याकडे पाठवावा. जरूर चौकशी करू,” असे फडणवीस म्हणाले.

‘एक जरी कॅमेरा असेल तर दाखवा’; भाजपचा पलटवार

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी हे आरोप फेटाळून लावत सुळे यांच्याकडे पुरावे असल्यास ते तपास यंत्रणांकडे किंवा माध्यमांकडे द्यावेत, असे म्हटले. मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी भीती निर्माण केली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“एक जरी कॅमेरा सापडला, तर स्वतः पाहणी करा. विनाकारण हवेत गोळीबार करू नका,” अशा शब्दांत बन यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिक्षक आणि पदवीधर मतदार भाजप व महायुतीला मतदान करतील, या भीतीतून असे आरोप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, स्पायकॅमच्या वापराबाबत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता आणि मतदान केंद्रातील कथित नियमभंगाबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!