उरुळी कांचन च्या मधुरा कुंजीर हिची गगनभरारी ; यूपीएससीच्या परिक्षेत थेट सैन्याच्या लेप्टनंट पदावर गवसणी…!


उरुळी कांचन : लहानपणापासूनच सैन्य दलात जाण्याचे स्वप्न उराशी बांधले होते. सैन्य दलाच्या माध्यमातून देशसेवा करण्याची ‘ती’ ची इच्छा होती. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिने यशाला गवसणी घातली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परिक्षेत ‘उरुळी कांचन’ची मधुरा संतोष कुंजीर हिने ११ वी रँक मिळवली असून तिची भारतीय सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ पदावर निवड झाली आहे.

अतिशय अवघड असलेल्या यूपीएससी परीक्षेतून तिने यश मिळवले असून ती महाराष्ट्रातून एकमेव महिला उमेदवार देखील ठरली आहे. उरुळी कांचनच्या मधुरा संतोष कुंजीर हिने हे देदिप्यमान यश मिळून आईवडिलांची आणि गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

मधुरा हिच्या यशामुळे तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर गावातील पंचक्रोशीला आनंद झाला आहे. तिने मिळविलेल्या यशाचे पुरंदर, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

इंडियन मिलिटरी अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि इंडियन एअर फोर्स अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा अतिशय अवघड समजली जाते. मात्र तिने आभ्यासाच्या जोरावर या परीक्षेत यश मिळवले आहे.

मधुरा कुंजीर यांचे मुळगाव वाघापूर (ता. पुरंदर) आहे. मधुरा यांचे वडील संतोष कुंजीर हे पुरंदर तालूका शिक्षक पतसंस्थेचे संचालक तर आई स्वाती कुंजीर ह्या मुख्याध्यापिका आहेत. मधुराचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूलमध्ये झाले. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मधुराने उरुळी कांचन केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला होता.

त्यानंतर मधुराने बारावीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून पूर्ण केले. तिने बारावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळविले होते. इंजीनियरिंग क्षेत्राची आवड असल्याने तिने जेईई. ॲडव्हान्स परीक्षा दिली आणि त्याही परीक्षेत यश मिळविले. पुणे येथील पी आय सी टी कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स पदवी पूर्ण करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

मधुराला लहानपणापासूनच सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. सैन्य दलात जाण्याची प्रेरणा तिच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सिंधुबाई कुंजीर व आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण कुंजीर यांच्याकडून मिळाली. तिच्या स्वप्नांना व इच्छांना बळ देण्याचे काम तिचे चुलते शिक्षक रमेश कुंजीर व चुलती शिक्षिका मनिषा कुंजीर यांनी केले. मधुरा आता चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेली आहे. लवकरच ती भारतीय सैन्य दलात ”लेफ्टनंट” म्हणून रुजू होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!