कल्याण मटका जुगार अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांची कारवाई, तिघांना अटक, मुद्देमालही जप्त…

उरुळी कांचन : येथील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सटवाई चौकाजवळ गोगीया बिल्डिंगच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली. तसेच जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम 700 रुपये जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार धनंजय भोसले यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सुनिल जयवंत गदादे (वय 60, रा. परीवर्तन सोसायटी, ता. हवेली), महादेव जनार्दन कांबळे (वय-71, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) रामनंद वसंतराव भारती (वय 42, रा. एम. जी. रोड, चोरघे बिल्डिंग, उरुळी कांचन, मुळगाव – किनगाव, ता. अहमदपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, आरोपी हे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याचे आढळले. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सटवाई चौकाजवळ गोगीया बिल्डिंगच्या आडोशाला कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. दरम्यान, यावेळी पोलिसांनी एक स्लिप बुक तसेच 700 रुपये रोख आणि निळ्या शाईचे बॉलपेन जप्त केले आहे. या प्रकरणी मुं. जु.का. क 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण चौधर करीत आहेत. जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी सध्या पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.