भाचीच्या लग्नात मामाचं धक्कादायक कृत्य, थेट जेवणात कालवलं विष, कोल्हापुरातील भयंकर प्रकार…

कोल्हापूर : आपल्या भाचीच्या लग्नात मामाने असे धक्कादायक कृत्य केले आहे, ज्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. भाचीच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमातील जेवणात विषारी औषध मिसळल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात घडली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
महेश जोतीराम पाटील असं आरोपी मामाचं नाव आहे.
नेमकं घडलं काय?
पीडित भाची ही उत्रे गावात आपल्या मामाकडे राहायला होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणाने मामा महेश पाटील याच्याकडे भाचीशी लग्न करायची मागणी घातली.
पण मामाने या लग्नाला विरोध केला. यामुळे भाचीने मामाच्या विरोधात जाऊन तिच्या प्रियकराशी लग्न केलं. यामुळे आरोपी मामाचा आपली भाची आणि तिच्या सासरच्या मंडळीवर राग होता. याच रागातून मामाने थेट स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात विषारी औषध टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपीच्या भाचीनं मागील आठवड्यात पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी मंगळवारी गावात वरात काढली होती. तसेच एका हॉलमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शेकडो पाहुणे उपस्थित होते.
या पाहुण्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता आरोपी मामा हातात औषध घेऊन समारंभ आयोजित केलेल्या हॉलमध्ये घुसला.
त्याने काहीही कळायच्या आत बाटलीतून आणलेलं औषध जेवणात मिसळायला सुरुवात केली. ही बाब आचाऱ्याने पाहताच आचार्याने त्याला विरोध केला. यावेळी झटापट झाल्यानंतर आरोपी मामा महेश पाटील घटनास्थळावरून पळून गेला.
अन्नात विषारी औषध मिसळल्याची माहिती हॉलमध्ये समजात घटनास्थळी मोठा गोंधळ उडाली. याप्रकरणी नवरदेव मुलाचे काका संजय पाटील यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.