शरद पवारांच्या दबावामुळे उद्धव ठाकरेंनी अहमदनगरचे नामांतर केले नाही, पडळकरांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दबावात येऊन अहमदनगरचे नामांतर केले नाही, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकारने काल चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात अहमदनगचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याची घोषणा केली.
त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवींचे जन्मगाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असे करावे, अशी लोकांची जनभावना होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, सभागृहात मागणी केली. परंतू शरद पवारांच्या दबावाखाली उद्धव ठाकरेंनी नामांतराचा निर्णय केला नाही.
पडळकर पुढे म्हणाले, आता आमचे सरकार आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि ११ महिन्याच्या आत सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचे घोषीत केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो. असे ते म्हणाले