अखेर ठरलं! शिंदे गटातील दोघे केंद्रीय मंत्रिमंडळात, मोदींकडून खास भेट

नवी दिल्ली : शिंदे-फडणवीस सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने खास भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे. यामुळे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. आता कुणाला मंत्री करायचे, यांचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते.
अमेरिका दौऱ्यावरुन परत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकांचा सपाटा लावला आहे. गुरुवारी रात्री मोदींची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले होते.
यामध्ये अनेक गोष्टी ठरल्या असल्याचे सांगितले जात आहे. राज्याच्या सत्तासंघर्षात शिंदेंनी दाखवलेल्या निष्ठेचं फळ दोन मंत्रीपदाच्या माध्यमातून दिले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांसह दिल्ली गाठली. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला आहे.